सोलापूर - सोलापूर शहराच्या गजबजलेल्या बाळीवेस परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यवसायातील स्पर्धेतून 'आंबे कमी दरात का विकतो?' असा जाब विचारत एका ४० वर्षीय तरुणाला चौघांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी, १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बाळीवेस येथील मारुती मंदिराजवळ घडली.


मिळालेल्या माहितीनुसार, वसीम मलंग बागवान (वय ४०, रा. बेगम पेठ, सोलापूर) हे बाळीवेस परिसरात आंबे विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी सायंकाळी ते आपला व्यवसाय करत असताना, संशयित आरोपी आरिफ रफिक बागवान आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर तीन जणांनी वसीम यांना गाठले. "तू आंबे इतक्या कमी दरात का विकतोस?" असा प्रश्न विचारून त्यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. आरिफ आणि त्याच्या साथीदारांनी वसीम बागवान यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात वसीम यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत.


घटनेनंतर जखमी वसीम बागवान यांनी स्वतःला सावरून तात्काळ श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय गाठले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत  करण्यात आली आहे. "फळविक्रीसारख्या व्यवसायातील स्पर्धेतून थेट शारीरिक हल्ला होणे ही बाब चिंताजनक आहे. किरकोळ वादातून होणाऱ्या अशा हिंसक घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.