Ticker

6/recent/ticker-posts

सोशल मीडियावर ओळख, मंदिराजवळ बोलावून अत्याचार; सोलापुरात नराधमाला २० वर्षांची सक्त मजुरी

 



सोलापूर: सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीशी मैत्री करून, तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाला सोलापूरच्या विशेष न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी आरोपीला २० वर्षे सक्त कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

राजकुमार सायबु खेत्री (वय २३ राहणार  सोलापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी राजकुमार हे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले होते. त्यांच्यात मोबाईलवरून संवाद सुरू होता. ८ डिसेंबर २०२० रोजी सकाळी आरोपीने पीडितेला अंबाबाई मंदिराच्या जवळ बोलावले. तिथून तिला मोटरसायकलवर आपल्या घरी नेले. घरात कोणीही नसताना त्याने तिच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर तिला घरी सोडले.

त्यानंतर पुन्हा ११ डिसेंबर २०२० रोजी आरोपीने पीडितेला त्याच मंदिराजवळ बोलावून मामाच्या शेतात नेले आणि तिथेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. १ जानेवारी २०२१ रोजी आरोपीने पीडितेला पुन्हा मंदिराजवळ बोलावून सिद्धेश्वर मंदिर, साईबाबा मंदिर आणि त्यानंतर कर्नाटक राज्यातील आगरखेड येथे नेले.


३१ डिसेंबर २०२० रोजी पीडिता आणि तिच्या आईमध्ये घरकामावरून भांडण झाले होते, ज्याची माहिती पीडितेने आरोपीला दिली होती. या सर्व घडलेल्या प्रकारानंतर पीडितेने अखेर आपल्या आईला हकीकत सांगितली. त्यानंतर नातेवाईकांनी विजापूर नाका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी राजकुमार खेत्री याच्याविरुद्ध बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक वाय. एस. गायकवाड यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

विशेष न्यायाधीश जे. जे. मोहिते यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले, तर आरोपीच्या बचावासाठी २ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद आणि पुरावे ग्राह्य धरून आरोपी राजकुमार याला दोषी ठरवत २० वर्षांचा सक्त कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.या खटल्यात सरकारच्या वतीने अॅड. श्रीमती कबिता बागल, अॅड. श्रीमती शितल डोके आणि अॅड. श्रीमती एस. एस. क्यातम यांनी काम पाहिले. तर आरोपीतर्फे अॅड. ए. एन. शेख यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी म्हणून श्रीमती एस. एस. घाडगे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments