Ticker

6/recent/ticker-posts

गन हाऊसबाहेर स्फोट; मालकावर गुन्हा दाखल


सोलापूर - शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका फटाक्यांच्या दुकानात सोमवारी सायंकाळी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत दुकानातील एक कामगार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?-

मिळालेल्या माहितीनुसार, मुरारजी पेठ परिसरातील 'सहारा गन हाऊस' या दुकानात ही घटना घडली. सोमवारी, ११ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:२० च्या सुमारास दुकानातील स्फोटक पदार्थांच्या बॉक्सचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, यात दुकानातील कामगार केदार सिध्दाप्पा छत्रे (रा. समतानगर, विजापूर रोड) हे गंभीररीत्या भाजले गेले.

दुकानदारावर गुन्हा दाखल - 

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्फोटक पदार्थांची हाताळणी करताना मानवी जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव असतानाही सुरक्षेची पुरेशी काळजी न घेतल्याचा ठपका दुकान मालकावर ठेवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून दुकान मालक बाळासाहेब प्रभाकर फुले (रा. अकलूज, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून तपास सुरू-

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. जखमी केदार छत्रे यांच्यावर यशोधर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डी. पाटील करत आहेत.

Post a Comment

0 Comments