सोलापूर: मित्राचा वाढदिवस साजरा करून आनंदाने घरी परतणाऱ्या पाच मित्रांच्या कारला उभ्या ट्रकने भीषण धडक दिली. या हृदयद्रावक अपघातात वाढदिवस असलेल्या तरुणासह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. हा थरार बुधवारी मध्यरात्री १ च्या सुमारास सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील पुणे नाका ते मार्केट यार्ड दरम्यान असलेल्या पर्ल गार्डनसमोर घडला.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कादर हांडे यांचा आज (७ मे) वाढदिवस होता. हा आनंद साजरा करण्यासाठी कादर आपल्या चार मित्रांसह बुधवारी रात्री पुणे रोडवरील एका ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. रात्री उशिरा जेवण आटोपून पाचही मित्र इर्टिगा कारने (क्रमांक MH 13 EK 7209) शहराकडे परतत होते.
मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांची कार हैदराबाद रोडवरील डी-मार्ट ओलांडून पुढे जात असताना, पर्ल गार्डनसमोर उभ्या असलेल्या एका ट्रकवर (क्रमांक MH 13 CU 8699) पाठीमागून जोरात धडकली. महामार्गावरील वळणामुळे चालकाला उभ्या ट्रकचा अंदाज आला नसल्याने ही धडक बसली.हा अपघात इतका भीषण होता की, उभ्या ट्रकला धडक बसताच कारचे संपूर्ण छत कापले जाऊन कागदासारखे बाजूला फेकले गेले. धडक बसल्यानंतर कार जागीच न थांबता तब्बल १५० फूट फरफटत गेली. या भीषण आवाजाने संपूर्ण परिसर हादरला आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

0 Comments