मंगळवेढा - मोबाईलच्या स्क्रीनवर नेहमी हसणारी, लाखो नेटकऱ्यांना आपल्या रील्सच्या माध्यमातून आनंद देणारी आणि पतीसोबत खांद्याला खांदा लावून यशाचे नवे शिखर सर करणारी सोशल मीडिया स्टार रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५) हिने अचानक जगाचा निरोप घेतला आहे. ब्रह्मपुरी येथील त्यांच्या स्वतःच्या 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या स्वयंपाकघरात लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन तिने आपली जीवनयात्रा संपवली. काल दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात आणि सोशल मीडिया विश्वात प्रचंड खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षभरापासून रोहिणी पाराध्ये आणि तिचे पती निलेश पाराध्ये हे दांपत्य सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होते. विविध सामाजिक विषय आणि खाद्यपदार्थांवरील त्यांचे रील्स नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत होते. रोहिणीचा हसरा चेहरा आणि दोघांची जुळणारी केमिस्ट्री यामुळे त्यांचे लाखो फॉलोअर्स होते. या लोकप्रियतेच्या जोरावरच त्यांनी रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर ब्रह्मपुरी येथे खवय्यांसाठी 'हॉटेल ग्रामपंचायत' सुरू केले होते. अत्यंत कमी वेळात या हॉटेलने मोठी प्रसिद्धी मिळवली होती.
व्यवसायात स्थिरस्थावर झाल्यानंतर हे दांपत्य हॉटेलच्या नवीन शाखा सुरू करण्याच्या तयारीत होते. नवीन स्वप्ने, नवे संकल्प डोळ्यांसमोर असतानाच अचानक असं काय घडलं की रोहिणीने इतकं टोकाचं पाऊल उचललं? हा प्रश्न आता सर्वांना सतावत आहे.काल दुपारी हॉटेलच्या स्वयंपाकघरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला रोहिणीने दोरीने गळफास घेतल्याचे समोर आले. पती निलेशने अत्यंत तातडीने तिला उपचारासाठी मंगळवेढ्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच तिला 'मृत' घोषित केले. डॉक्टरांचे ते शब्द ऐकताच निलेश यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर आभाळ कोसळले.
नेहमी इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीचा, एका यशस्वी रीलस्टारचा असा करुण अंत होईल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. याप्रकरणी पती निलेश पाराध्ये यांनी पोलिसांत रीतसर खबर दिली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र, रोहिणीच्या जाण्याने सोशल मीडियावरील तिचे चाहते आणि कुटुंबियांना कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

0 Comments