Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर ब्रेकिंग । हिप्परगा तलावात बुडून २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; नई जिंदगी परिसरात शोककळा

 


सोलापूर - मित्रांसोबत हिप्परगा तलाव परिसरात फिरायला गेलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोसिन रशीद शेख (वय २८, रा. विष्णुनगर, नई जिंदगी, सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे नई जिंदगी आणि विष्णुनगर परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, शेख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोसिन शेख हे आपल्या काही मित्रांसोबत हिप्परगा तलाव परिसरात गेले होते. तलावाच्या काठावर असताना ते पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खोल पाण्यात बुडू लागले. त्यांना बुडताना पाहून सोबत असलेल्या मित्रांनी तातडीने त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, पाण्याची खोली अत्यंत जास्त असल्याने मित्रांचे प्रयत्न अपुरे पडले आणि मोसिन डोळ्यांदेखत पाण्यात बेपत्ता झाले.

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाकडून तलावाच्या पाण्यात शोधमोहीम राबवण्यात आली. काही वेळेच्या अथक प्रयत्नांनंतर मोसिन शेख यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.या धक्कादायक घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात 'आकस्मिक मृत्यू' म्हणून करण्यात आली आहे. मोसिन यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेच्या वेळी नेमके काय घडले, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.या दुर्दैवी घटनेमुळे मोसिन यांच्या मित्रपरिवारासह संपूर्ण नई जिंदगी परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. 

Post a Comment

0 Comments