सोलापूर - सोलापूर शहरातील मार्केट यार्ड रोडवरील बोरामणी नाका परिसरात आज गुरुवारी सकाळी एका भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, त्याच्यासोबत असलेला दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज गुरुवारी सकाळी मार्केट यार्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर बोरामणी नाका जवळ हा अपघात झाला. दुचाकीवरून प्रवास करत असताना हा अपघात इतका भीषण होता की, त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातातील मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस मृताच्या जवळील दुचाकीच्या क्रमांकावरून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. दरम्यान, या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीने सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.बोरामणी नाका आणि मार्केट यार्ड परिसर हा नेहमीच रहदारीचा असतो. येथे अवजड वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावरील वाहतूक नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
टिप: या घटनेचा अधिक तपशील आणि मृताचे नाव समजताच बातमी अपडेट केली जाईल.

0 Comments