Ticker

6/recent/ticker-posts

फडणवीसांच्या सभेनंतर जेवणाच्या पाकिटांसाठी नागरिकांची झुंबड

 




सोलापूर - नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या सत्कार सोहळ्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी दुपारी सोलापुरात भव्य सभा संपन्न झाली. मात्र, या सभेनंतर जेवणाच्या पाकिटांवरून शहरात मोठी धावपळ उडाली. कडक उन्हात सभेला आलेल्या नागरिकांनी जेवणाचे पाकिट घेण्यासाठी गर्दी केल्याने हरीबाई देवकरण प्रशालेसमोर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती.

बार्शीचा दौरा आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी सोलापूर शहरात दाखल झाले. भाजपचे महापौर विनायक कोंड्याल, शहरमध्यचे आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या सभेच्या नियोजनासाठी मोठे परिश्रम घेतले होते. शहराच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आणि नागरिक या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकीकडे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा कमालीचा वाढला आहे. अशा कडक उन्हात नागरिक मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकण्यासाठी आले होते. सभा संपल्यानंतर भुकेने व्याकुळ झालेल्या नागरिकांसाठी भाजपच्या वतीने जेवणाच्या पाकिटांची व्यवस्था करण्यात आली होती.जेवणाची पाकिटे वाटण्याचे ठिकाण मुख्य रस्त्यावरील हरीबाई देवकरण प्रशालेसमोर असल्याने, पाकिटे घेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली.

जेवणाचे पाकिटांसाठी लोक एकमेकांवर तुटून पडल्याने तिथे काही काळ गोंधळाचे वातावरण होते.तसेच या गर्दीमुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून तेथे कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने प्रसंगावधान राखले. त्यांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आणि काही काळानंतर वाहतूक पूर्वपदावर आली​.भाजपच्या या नियोजित सभेत जेवणाच्या वाटपाच्या अव्यवस्थेमुळे सर्वसामान्यांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.

Post a Comment

0 Comments