Ticker

6/recent/ticker-posts

'स्मार्ट' कारभार रामभरोसे | बिल भरूनही 3-3तास वीज मिळेना; स्वागत नगर महावितरण कार्यालत मात्र ऑफलाईन सल्ले

 


सोलापूर -एकीकडे सोलापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका असह्य झाला असून नागरिक घामाघूम झाले आहेत. अशा भीषण उन्हात घराबाहेर पडणे कठीण झाले असताना, दुसरीकडे सोलापूर शहरातील महावितरणच्या 'स्मार्ट मीटर'च्या धरसोड कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक पुरते हैराण झाले आहेत. वीज बिल भरूनही तब्बल तीन-तीन तास वीजपुरवठा पूर्ववत होत नसल्याने ग्राहकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

कार्यालयात फक्त 'ऑनलाइन'चे सल्ले; मदतीला कोणीच नाही-

या त्रासाला कंटाळून त्रस्त ग्राहकांने सोलापूर शहरातील स्वागत नगर येथील महावितरण कार्यालयात धाव घेतली. मात्र, तिथेही त्यांना केवळ आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही. ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार केली असता, अधिकाऱ्यांनी "ऑनलाइन वीज बिल भरा, लाईट आपोआप सुरू होईल" असे सांगून हात वर केले. विशेष म्हणजे, बिल भरून अनेक तास उलटले तरी वीज सुरू का झाली नाही, हे पाहण्यासाठी किंवा ग्राहकांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी एकही कर्मचारी घटनास्थळी जाण्यास किंवा मीटरची पाहणी करण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे.

ग्राहकांना बिल भरूनही उकाड्यात राहावे लागत आहे. महावितरणचे हे स्मार्ट मीटर ग्राहकांसाठी 'स्मार्ट' ठरण्याऐवजी मनस्ताप देणारे ठरत आहेत. कार्यालयात गेलो तर तिथे कोणीही प्रत्यक्ष येऊन बघायला तयार नाही. मग या डिजिटल यंत्रणेचा काय फायदा?

स्मार्ट मीटर की ग्राहकांची छळवणूक? -

महावितरणने डिजिटल क्रांतीचा दावा करत सोलापुरात स्मार्ट मीटर बसवले खरे, पण त्याचा थेट फटका आता सर्वसामान्यांना बसत आहे. आधीच सोलापूरकर कडक उन्हाने होरपळत आहेत, त्यात भर म्हणून महावितरणच्या या ढिसाळ आणि असंवेदनशील कारभारामुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींचे हाल होत आहेत.

ऑनलाइन सिस्टीममधील त्रुटींमुळे बिल भरूनही जर वीज आपोआप सुरू होत नसेल, तर महावितरणचे कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन मदत का करत नाहीत? असा संतप्त सवाल आता सोलापूरकर विचारत आहेत. या समस्येवर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ दखल घेऊन सोलापुरातील स्वागत नगर येथील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना समज देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments