सोलापूर - स्वागत नगर येथील ताई चौक परिसरात पूर्ववैमनस्यातून चार मित्रांनी मिळून आपल्याच एका १९ वर्षीय मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. प्रथमेश बबन गायके (वय १९, रा. रवींद्र नगर, ताई चौक, सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सोलापूर पोलिसांनी तत्परता दाखवत गुरुवारी रात्रीच तिघा संशयितांना अटक केली आहे.


अजय सुनील जाधव ऊर्फ घाटोळे (वय २५, रा. ताई चौक, नई जिंदगी),पीयूष उर्फ पिन्या पप्पू गायकवाड (वय २१, रा. देसाई नगर, नई जिंदगी),साहिल रहमान शेख (वय २३, रा. नई जिंदगी, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत प्रथमेश याचा काही दिवसांपूर्वी एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलासोबत जोरदार वाद झाला होता. या कडाक्याच्या भांडणाच्या आणि पूर्ववैमनस्याच्या पार्श्वभूमीतूनच हा खुनाचा थरार घडला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश हा रिक्षा चालक म्हणून काम करायचा, तसेच तो पेंटिंगची कामेही करायचा. आपल्या कामातून तो वडिलांना घर चालवण्यासाठी मोठा हातभार लावत होता. बुधवारी कामाला सुट्टी असल्याने तो दिवसभर मित्रांसोबत फिरण्यासाठी गेला होता आणि रात्री उशिरा घरी परतला. त्यानंतर गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा घरातून बाहेर पडला.

दुपारी चार वाजेच्या सुमारास ताई चौकातील काटेरी झुडपामध्ये प्रथमेश रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याची माहिती समोर आली. प्रथमेशचे वडील बबन गायके यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, प्रथमेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि त्याच्या पाठीमागील डोक्याजवळ गंभीर जखम झाली होती.

​वडिलांनी तातडीने आरडाओरड करून स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रथमेशला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

​या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून रात्रीच तिघांना गजाआड केले आहे. या प्रकरणातील चौथ्या आरोपीचा शोध आणि पुढील तपास पोलीस करत आहेत.