सोलापूर - शहराला ध्वनिप्रदूषणाच्या विळख्यात ढकलणाऱ्या ‘डीजे’ आणि ‘डॉल्बी’ला हद्दपार करण्यात सोलापूरकरांना यश आले असले, तरी आता रस्त्यांवरील रिक्षांमधील अवैध साउंड सिस्टीम नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. "सोलापूर डीजे मुक्त झाले, मग रिक्षांमधील हा कर्णकर्कश आवाज कधी बंद होणार?" असा संतप्त सवाल आता सुशिक्षित सोलापूरकरांमधून विचारला जात आहे.
'नो डीजे, नो डॉल्बी' मोहीम यशस्वी -
पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या कडक भूमिकेमुळे आणि सोलापूरकरांनी घेतलेल्या 'नो डीजे'च्या शपथेमुळे शहरातील गणेशोत्सवासह सर्वच धार्मिक कार्यक्रम आणि मिरवणुका पूर्णपणे डीजेमुक्त झाल्या. प्रशासनाच्या या कौतुकास्पद निर्णयामुळे सोलापूरने राज्यासमोर एक नवा आदर्श ठेवला. ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखण्यात या मोहिमेमुळे मोठी मदत झाली.
आता रिक्षा बनल्या 'चालते-फिरते डीजे' -
डीजेवर बंदी आली असली, तरी सोलापूर शहरातील रस्त्यांवरून धावणाऱ्या अनेक रिक्षा आता 'चालते-फिरते डीजे' बनल्याचे चित्र आहे.अनेक रिक्षाचालकांनी आपल्या वाहनात मोठ्या क्षमतेचे स्पिकर्स आणि बुफर बसवले आहेत.रस्त्यावरून जाताना कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात गाणी वाजवली जातात.शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या शांतता क्षेत्रांमधून जातानाही या आवाजाची तीव्रता कमी केली जात नाही.सोलापूर शहरातील कुमठा नाका, स्वागत नगर, निलम नगर, शांती नगर, देसाई नगर,आसरा चौक या मार्गांवर रिक्षा चालक मोठमोठया आवाजात गाणी वाजवत रिक्षा चालवतात.
या मोठ्या आवाजाचा त्रास केवळ पादचाऱ्यांनाच नाही, तर रिक्षात बसणाऱ्या प्रवाशांना, विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांना सहन करावा लागत आहे. यामुळे हृदयविकाराचे रुग्ण आणि शाळकरी मुलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे."पोलीस प्रशासनाने मिरवणुकीतील डीजे बंद करून सोलापूरला शांतता दिली, याबद्दल आभार. पण आता शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून धावणाऱ्या या रिक्षांमधील अनधिकृत साउंड सिस्टीमवरही वाहतूक पोलिसांनी आरटीओच्या मदतीने कडक कारवाई करण्याची वेळ आली आहे."

0 Comments