सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात शनिवारी दुपारी माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत थरारक घटना उघडकीस आली. एकाच कुटुंबातील आई आणि तिच्या दोन तरुण मुलांची तलवारीने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मालमत्तेचा वाद किंवा कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बोरामणी येथील रहिवासी गायत्री सुधाकर मस्के (वय 42) या विधवा असून त्या आपली मुलगी प्रिया (वय 18) आणि मुलगा शिवराज (वय 16) यांच्यासह गावात राहत होत्या. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शुक्रवारी रात्री हे तिघेही घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्री 12 च्या सुमारास, काळोखाचा फायदा घेत अज्ञात मारेकऱ्याने घराच्या गच्चीवर प्रवेश केला.
हातात धारदार तलवार घेऊन आलेल्या या नराधमाने झोपेत असलेल्या माय-लेकींवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. गायत्री आणि प्रिया यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, आपला जीव वाचवण्यासाठी सोळा वर्षांचा शिवराय गच्चीवरून खाली बैठकीच्या खोलीत पळाला, मात्र मारेकऱ्याने त्याचा पाठलाग करून तिथेच त्याला गाठले आणि त्याचीही हत्या केली.
शनिवारी दुपारपर्यंत मस्के यांच्या घरातून कोणतीही हालचाल न झाल्याने आणि दरवाजा उघडला न गेल्याने शेजाऱ्यांना शंका आली. जेव्हा काही लोकांनी घरात डोकावून पाहिले, तेव्हा बैठकीच्या खोलीत शिवरायचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह दिसला. गच्चीवर जाऊन पाहिले असता तिथे माय-लेकींचे छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह पडले होते. गावकऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली.घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलिसांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले असून, रक्ताचे नमुने आणि इतर पुरावे गोळा केले जात आहेत.तिन्ही मृतदेह पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.गायत्री मस्के यांचे पती सुधाकर मस्के यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्या आपल्या मुलांसह स्वतंत्र राहत होत्या. त्यांच्या घराशेजारीच त्यांच्या सख्ख्या दिरांची घरे आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मस्के कुटुंबात गेल्या काही काळापासून शेती आणि जमिनीवरून प्रापंचिक वाद सुरू होते. याच वादातून हे टोकाचे पाऊल उचलले गेले असावे, असा पोलिसांचा संशय आहे.
आज नुकताच 12 मध्ये शिकत असलेल्या प्रिया मस्के या तरुणीला 68 टक्के मार्क मिळाले आहे.तर शिवराज मस्केला 10 मध्ये 61 टक्के मार्क मिळाले आहे.दोन तरुण मुलांसह आईची अशा प्रकारे हत्या झाल्याने बोरामणी गावात शोककळा पसरली आहे. भरवस्तीत आणि घराशेजारी नातेवाईक असतानाही हे हत्याकांड घडल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

0 Comments