पुणे - पुणे पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना २८ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शनिवारी रंगेहात पकडले. पदोन्नती होऊन बदलीची ऑर्डर हातात असतानाच ही कारवाई झाल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

वैशाली तोटेवार या पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होत्या. त्यांच्याकडे काही तक्रार अर्जांच्या चौकशीचे काम सोपवण्यात आले होते. यातील एका तक्रार अर्जाच्या चौकशीत मदत करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे ३० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने यापूर्वीच तोटेवार यांना २ लाख रुपये दिले होते. उर्वरित २८ लाख रुपयांसाठी तोटेवार यांनी तगादा लावला होता. तक्रारदाराने यासंदर्भात एसीबीकडे धाव घेतली.

 शनिवारी (२ मे) बंडगार्डन रस्त्यावरील एका आलिशान हॉटेलसमोर एसीबीने सापळा रचला. तोटेवार यांनी ही रक्कम स्वीकारण्यासाठी एका खाजगी व्यक्तीला पाठवले होते. तो पैसे स्वीकारत असतानाच पथकाने त्याला आणि तोटेवार यांना ताब्यात घेतले.

विशेष म्हणजे, तोटेवार यांची नुकतीच पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाली होती आणि त्यांची बदली मुंबई लोहमार्ग पोलीस दलात करण्यात आली होती. शुक्रवारीच (१ मे) त्यांना पुणे पोलीस दलातून कार्यमुक्त (Relieve) करण्यात आले होते. मात्र, जुन्या केसचा 'हिशोब' चुकता करण्याच्या नादात त्या एसीबीच्या जाळ्यात अडकल्या.


कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने तोटेवार यांच्या पोलीस आयुक्तालयातील कार्यालय आणि त्यांच्या निवासस्थानाची कसून झडती घेतली आहे. या प्रकरणी तोटेवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या खाजगी व्यक्तीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.