सोलापूर - ज्या सोलापूर जिल्ह्याची ओळख आजवर 'दुष्काळी जिल्हा' म्हणून होती, ती आता दुर्दैवाने 'रक्तरंजित सोलापूर' अशी होऊ लागली आहे. गेल्या ७२ तासांत जिल्ह्याच्या विविध भागांत तब्बल ६ निर्घृण खून झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
१. उळेगावात रक्ताचा सडा (१ मे ) -
१ एप्रिल रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव येथून सुरू झाले. येथील शिवाजी नगरचे रहिवासी संजय विठ्ठल शिंदे (वय ५४) यांची अज्ञात कारणावरून गळा चिरून हत्या करण्यात आली. अज्ञात आरोपीने त्यांच्या मानेवर शस्त्राने वार केले होते. या घटनेने परिसरात पहिल्यांदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
२. वैरागमध्ये दगडाने ठेचून तरुणाचा अंत (१ मे) -
दुसरी घटना बार्शी तालुक्यातील वैराग शहरात घडली. शनिवारी २ मे रोजी वैरागच्या दत्तनगर परिसरात दिनेश उर्फ अप्पासाहेब दादासाहेब कापसे (वय ३१) या तरुणाचा डोक्यात दगड घालून अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला. भरवस्तीत झालेल्या या खुनामुळे बार्शी तालुक्यात तणावाचे वातावरण पसरले होते.
३. बोरामणीत तिहेरी हत्याकांड: एकाच कुटुंबाचा घात (२ मे) -
वैरागची घटना ताजी असतानाच, २ मे रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातून एक काळजाचा थरकाप उडवणारी बातमी आली. एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.गायत्री सुधाकर मस्के (वय ४२) प्रिया मस्के (वय १८ - मुलगी),शिवराज मस्के (वय १६ - मुलगा) या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्याची झोप उडवली आहे.
४. रविवारी सकाळी शहरात थरार (३ मे)
शहरातील गजबजलेला भाग असलेल्या सत्तर फूट रोड परिसरात रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुन्हा एकदा रक्ताचा खेळ झाला. माधव नगर येथे सुरेश कृष्णा श्रीराम (वय ३५, रा. नीलम नगर) यांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या झालेल्या या खुनामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.अवघ्या तीन दिवसांत सहा हत्या झाल्याने सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस दलावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.

0 Comments