सोलापूर - सत्तर फूट रोड परिसरात नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती. ३५ वर्षीय सुरेश श्रीराम आपल्या दुचाकीवरून जात असताना, त्याला साधी कल्पनाही नव्हती की मृत्यू काही पावलांवरच त्याची वाट पाहत उभा आहे.अचानक दोन-तीन दुचाकी समोरून आल्या आणि त्यांनी सुरेशची वाट अडवली. गाडी थांबताच ५ ते ६ जणांच्या टोळीने सुरेशवर हल्ला चढवला. त्यांच्या हातात कोयते, लाकडी काठ्या आणि जड दगड होते. सुरेशने जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला, पण नराधमांनी त्याला घेरले होते.
भरदुपारी, सर्वांदेखत त्या टोळीने सुरेशवर ३५ वार केले. कोयत्याने सपासप वार होत होते, काठ्यांनी शरीराचे हाडं मोडली जात होती. इतक्यावरही आरोपींचा राग शांत झाला नाही, त्यांनी सुरेशच्या डोक्यावर मोठे दगड घालून त्याचा चेहरा चेंदामेंदा केला. घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला होता आणि हा निर्घृण प्रकार पाहून परिसरातील लोकांच्या काळजाचा ठोका चुकला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि जेलरोड पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, या हत्याकांडाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला. पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली आणि गुन्हा घडल्यानंतर अवघ्या एका तासात ५ आरोपींना बेड्या ठोकल्या. सहाव्या आरोपीचा शोध अजूनही सुरू आहे.
हा जुन्या वादातून झालेला पूर्वनियोजित हल्ला होता. आम्ही ५ जणांना ताब्यात घेतले असून मुख्य सूत्रधारासह सर्वांवर कडक कारवाई केली जाईल." - विजय कबाडे, पोलीस उपायुक्त, सोलापूर.

0 Comments