सोलापूर - शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुनी मिल कंपाउंड परिसरात आज संद्याकाळच्या काडतुसांचा भीषण स्फोट झाला. 'सहारा गन हाऊस'च्या समोर वाहनात काडतुसे ठेवत असताना ही दुर्घटना घडली. या स्फोटात गन हाऊसचा कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.
बाळासाहेब प्रभाकर फुल्ले यांच्या मालकीच्या सहारा गन हाऊसमधून काडतुसे हलविण्याचे काम सुरू होते. दुपारी कर्मचारी केदार सिद्धप्पा छत्रे वय ५३, राहणार रामलिंग नगर, विजापूर रोड हे गंधकाने भरलेली काडतुसे एका कारमध्ये ठेवत होते. यावेळी अचानक काडतुसांचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज संपूर्ण परिसरात घुमला.
स्फोटात केदार छत्रे यांच्या हाताला आणि शरीराला गंभीर इजा झाली आहे. त्यांना तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून समजते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण,फॉरेन्सिक टीम,बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.हा स्फोट नेमका कशामुळे झाला, स्फोटाचे नेमके स्वरूप काय होते, याचा तपास फॉरेन्सिक टीम आणि पोलीस करत आहेत.

0 Comments