सोलापूर: छेडछाड करून मानसिक त्रास देऊ नका, असे बजावल्याचा राग मनात धरून नवनाथ खरात यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पिता-पुत्राला सत्र न्यायालयाने सोमवारी ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तुकाराम उर्फ मुन्ना खुळे (५२) आणि त्याचा मुलगा ओंकार खुळे (२१, रा. मुरारजी पेठ) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
२०१८ मध्ये ही घटना घडली होती. पीडित नवनाथ खरात यांनी आरोपींना छेडछाड थांबवण्याबाबत आणि मानसिक त्रास न देण्याबाबत हटकले होते. याचा राग धरून खुळे पिता-पुत्राने खरात यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात खरात गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेतच त्यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.फौजदार चावडी पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्यासमोर झाली.सुनावणी दरम्यानसरकारने एकूण १० साक्षीदार तपासले. यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली.सरकारी वकील अॅड. प्रकाश जन्नू यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.दोन्ही आरोपींना प्रत्येकी ५ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिने कैदेची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदीपसिंग राजपूत व सहायक सरकारी वकील प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले. तर आरोपींच्या वतीने अॅड. जयदीप माने यांनी बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक आय. व्ही. कोकरे यांनी केला होता.

0 Comments