सोलापूर - निसर्गाच्या कुशीत वसलेलं दक्षिण सोलापूरचं कारकल गाव... जिथे मातीच्या वासासोबत कष्टाचा घाम मिसळलेला असतो. याच मातीत संतोषकुमार अंकलगी यांचं छोटं पण सुखी कुटुंब होतं. पण काही वर्षांपूर्वी एका अपघाताने या कुटुंबाचा आधारस्तंभ हिरावून घेतला. पतीच्या निधनानंतर आई उषा आणि आजी महादेवी यांनी आपल्या काळजाच्या दोन तुकड्यांना—श्रवण (१५) आणि श्रावणीला (१०)—खूप कष्टाने वाढवलं होतं.
बाप नसल्याची उणीव मुलांच्या अंगाला लागू नये म्हणून आई दिवसभर शेतात राबायची. 'आपली मुलं शिकली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत' हेच त्या माऊलीचं एकमेव स्वप्न होतं.रविवारची ती दुपार. शाळांना सुट्टी असल्याने विंचूरहून श्रवण आपल्या घरी, आई-आजीकडे आला होता. घरात आनंदाचं वातावरण होतं. आई कामानिमित्त सोलापूरला गेली होती, आणि घरी आजीसोबत ही दोन्ही भावंडं होती. उन्हाचा कडाका आणि बालसुलभ उत्साह यामुळे दोघांना शेततळ्यात पोहण्याचा मोह झाला.
शेततळं हे शेतकऱ्यासाठी 'लक्ष्मी' असतं, पण त्याच तळ्यात काळाने टपून बसलेलं असेल याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. सावधगिरी म्हणून श्रवणने झाडाला दोरी बांधून ती स्वतःच्या कमरेला गुंडाळली होती, जेणेकरून आधार मिळेल. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. ज्या दोरीवर त्यांनी विश्वास ठेवला, तीच दोरी निसटली .
श्रावणी... श्रवण... अरे किती वेळ पोहणार?" आजीने दुरूनच आवाज दिला. पण पलीकडून फक्त पाण्याचा संथ आवाज येत होता. नेहमी दंगामस्ती करणाऱ्या नातवंडांचा आवाज शांत झाला होता. आजीच्या काळजाचा ठोका चुकला. थरथरत्या पावलांनी त्या शेततळ्यापाशी पोहोचल्या आणि समोरचं दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.ज्या नातवंडांना डोळ्यांत तेल घालून वाढवलं, ती दोन्ही फुलं पाण्यात निपचित पडली होती. आजीच्या किंकाळ्यांनी आसमंत फाटला. शेजारी धावून आले, त्यांनी मुलांना बाहेर काढलं, दवाखान्यात नेलं... पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.शेततळं भरलं, पण संसाराचं तळं रितं झालं." आज संपूर्ण सोलापूर या घटनेने हळहळत आहे.

0 Comments