Ticker

6/recent/ticker-posts

संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडला; पत्नीशी झालेल्या वादामुळे तरुण ड्रायव्हरची टोकाची पाऊल







सोलापूर: प्रेमविवाह म्हणजे सुखाचा संसार, अशी स्वप्ने उराशी बाळगून आयुष्य सुरू केलेल्या एका तरुणाने अखेर मृत्यूला कवटाळले आहे. पत्नीशी झालेल्या किरकोळ भांडणाचे पर्यावसान एका भीषण घटनेत झाले असून, अवघ्या २५ वर्षांच्या हिराजी देढे या तरुणाने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.


मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या बाळे भागातील लक्ष्मीनगर येथे राहणारा हिराजी मारुती देढे (वय २५) हा तरुण व्यवसायाने ड्रायव्हर होता. काही काळापूर्वीच त्याने प्रेमविवाह केला होता. मंगळवारी सकाळी किरकोळ कारणावरून हिराजीचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले. या वादातून पत्नी रागाच्या भरात घर सोडून निघून गेली. पत्नीने घर सोडल्याचा धक्का आणि राग हिराजीच्या मनाला इतका लागला की, त्याने थेट मृत्यूचा मार्ग निवडण्याचा टोकाचा निर्णय घेतला.


हिराजीने आत्महत्येपूर्वी आपल्या भावाला फोन केला होता. आपण कुठे आणि कशा प्रकारे स्वतःला संपवणार आहोत, याची कल्पना त्याने भावाला दिली. घाबरलेल्या भावाने तातडीने हिराजीचा शोध घेण्यासाठी धावपळ सुरू केली. मात्र, जेव्हा भाऊ देगाव शिवारातील साळुंखे यांच्या शेतात पोहोचला, तेव्हा तिथे हिराजीची दुचाकी उभी होती आणि समोरच्या चिंचेच्या झाडाला त्याने नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे विदारक दृश्य दिसले.


घटनेची माहिती मिळताच सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे हवालदार आर.एस. मामुरे यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळ गाठले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने हिराजीचा मृतदेह झाडावरून खाली उतरवण्यात आला. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला 'मृत' घोषित केले. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments