तुळजापूर - गावात चोरी करण्यासाठी आल्याच्या निव्वळ संशयावरून जमावाने दोन तरुणांना काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे घडली आहे. या अमानुष मारहाणीत एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी निलेगाव येथील १६ जणांविरुद्ध खुनासह अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (३ एप्रिल) रात्री आठच्या सुमारास निलेगाव येथील मारुती मंदिरासमोर ही घटना घडली. बबन चंदर काळे (रा. पारधी वस्ती, तुळजापूर खुर्द) आणि सागर जयराम भोसले हे दोघे निलेगाव परिसरात गेले असता, संशयित आरोपी पिंकी शिंदे, विकी शिंदे आणि राहुल शिंदे यांनी त्यांना पकडले. 'हे दोघे चोरी करण्यासाठी आले आहेत' असा ओरडा करून त्यांनी गावकऱ्यांना जमा केले.
काही क्षणातच तिथे मोठा जमाव जमला आणि त्यांनी काहीही शहानिशा न करता बबन काळे व सागर भोसले यांना काठ्यांनी अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत बबन काळे हे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
गुन्हा दाखल झालेले आरोपी -
मोहसीन वजोद्दीन इनामदार, पापा वजोद्दीन इनामदार, शंकर ऊर्फ श्रीधर जमादार, विठ्ठल महादेव घंटे, प्रकाश दशरथ जमादार, धनेश्वर प्रकाश जमादार, आदित्य प्रकाश जमादार, सचिन मारुती जमादार, पवन हनमंत जमादार, दादा बस्वराज जमादार, नितीन मारुती जमादार, समर्थ रमेश जमादार, रमेश अर्जुन जमादार, पिंकी शैलेश शिंदे, विकी शैलेश शिंदे आणि राहुल शैलेश शिंदे (सर्व रा. निलेगाव) यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(२) (खून), ११८(१), ११५(२), १८९, १९०, १९१ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (अॅट्रॉसिटी) कलम ३(२)(v) नुसार गुन्हा नोंदवला आहे.अधिक तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.

0 Comments