सोलापूर: सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने सोलापूर जिल्हा आणि शहराची संपूर्ण कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त केली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यानंतर अवघ्या काही तासांतच हा निर्णय घेण्यात आल्याने जुन्या पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
मेळावा संपला अन् चक्रे फिरली -
सोमवारी सोलापुरात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर नवनियुक्त संपर्कप्रमुख खासदार धैर्यशील माने आणि खासदार ज्योती वाघमारे यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नेमकं काय घडलं, हे स्पष्ट झाले नसले तरी, बैठकीनंतर पक्षाने अत्यंत कठोर पाऊल उचलले.
पक्षाने जिल्हा आणि शहराची कार्यकारिणी बरखास्त केल्याचे समजताच, शासकीय विश्रामगृहावर उपस्थित असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांची एकच पळापळ झाली. ज्यांच्याकडे महत्त्वाची पदे होती, अशा अनेक नेत्यांनी धक्का बसल्याने विश्रामगृहातून तातडीने काढता पाय घेतला. "बैठकीनंतर असे काय कळाले की सगळेच पळाले?" अशी चर्चा आता सोलापूरच्या राजकीय गोटात रंगू लागली आहे.


0 Comments