सोलापूर: किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका १५ वर्षीय मुलाने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुमठा तांडा येथे घडली. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या पृथ्वीराज संजय राठोड याने रविवारी मध्यरात्री घराजवळील झाडाला साडीने गळफास लावून आत्महत्या केली.
नेमकी घटना काय? -
पृथ्वीराज हा घरात सर्वांचा लाडका होता. मात्र, अतिलाडामुळे तो स्वभावाने काहीसा हट्टी झाला होता. यापूर्वीही अनेकदा रागाच्या भरात तो घर सोडून निघून गेला होता. रविवारी पुन्हा अशाच एका किरकोळ कारणावरून त्याने घर सोडले. दिवसभर नातेवाईकांनी शोध घेऊनही तो सापडला नाही. रात्रीच्या सुमारास जेव्हा त्याची आई त्याला फोन करत होती, तेव्हा घराजवळील झुडपात त्यांना मोबाईलचा उजेड दिसला. आईने जवळ जाऊन पाहिले असता, पृथ्वीराज झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर -
पृथ्वीराजला दोन बहिणी असून तो घराचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील रुग्णवाहिका चालक म्हणून काम करतात. अत्यंत लाडाने वाढवलेल्या मुलाने अशा प्रकारे मृत्यूला कवटाळल्याने राठोड कुटुंबावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, अशोक तरंगे व हवालदार सागर सांगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
हॉस्पिटलमध्ये नातेवाइकांची गर्दी -
पृथ्वीराजला तातडीने अश्विनी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यात आला असता, नातेवािकांनी व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. केवळ एका क्षणाच्या रागापायी आणि हट्टीपणामुळे एका उमलत्या आयुष्याचा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

0 Comments