Ticker

6/recent/ticker-posts

वॉटर पार्कची सहल ठरली शेवटची...१० वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

 

सोलापूर - सोलापूर येथील ‘शॉवर अॅन्ड टॉवर वॉटर पार्क’मध्ये पोहताना अचानक चक्कर येऊन पडल्याने एका १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. इकरा मोहम्मद गौस भागानगरी (वय १०, रा. मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर) असे मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १९ मे) इकरा ही आपल्या कुटुंबासह आणि नातेवाइकांसोबत वॉटर पार्कमध्ये फिरण्यासाठी गेली होती. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सर्वजण पाण्यात खेळण्याचा आनंद घेत होते. दरम्यान, पाण्यात पोहत असताना इकराला अचानक चक्कर आली.

इकराची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच पालकांनी तिला तातडीने उपचारासाठी सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) विष्णू गायकवाड आणि पोलीस हवालदार आर. डी. दुधाळ यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली आणि प्राथमिक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

​या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चिमुरडीच्या मृत्यूचे अचूक कारण अद्याप समोर आले नसून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments