धक्कादायक । मोबाईलचा हट्ट ठरला जीवघेणा; पेनुरमध्ये १३ वर्षीय मुलाची आत्महत्या





सोलापूर - मोबाईल वापरायला न दिल्याच्या रागातून १३ वर्षांच्या शाळकरी मुलाने राहत्या घरी जीवन संपवल्याची धक्कादायक घटना पेनुर येथे रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. यशराज धर्मराज डोके (वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, धर्मराज डोके हे कुटुंबासह पेनुर येथील टेकळे वस्ती येथे वास्तव्यास असून शेती करून उदरनिर्वाह करतात. रविवारी सायंकाळी यशराजने मोबाईल वापरण्याची मागणी केली होती. मात्र कुटुंबीयांनी मोबाईल वापरास नकार दिल्याने तो रागावला. रागाच्या भरात त्याने घरातील खोलीत जाऊन टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

बराच वेळ दरवाजा न उघडल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी लोखंडी रॉडच्या सहाय्याने दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला असता यशराज बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तातडीने पेनुर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलांमध्ये वाढता मोबाईल वापर आणि त्यातून निर्माण होणारे ताणतणाव याबाबत पालकांनी जागरूक राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments