सोलापूर -सोलापूर शहरासह जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. राज्य राखीव पोलीस दलातील (SRPF) एका तरुण जवानाने सासरच्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. विलास सर्जेराव शिंदे (वय ३५) असे या मृत जवानाचे नाव असून, त्यांच्या आत्महत्येमुळे पोलीस दलात आणि मुळेगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विलास शिंदे हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील रहिवासी होते. ते दौंड येथील एसआरपीएफ बल गट क्रमांक ७ मध्ये कार्यरत होते. सध्या ते सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथे आपल्या सासरच्या घरी राहत होते. विलास शिंदे यांच्या पत्नी पूनम शाम काळे या सोलापूर शहर पोलीस मुख्यालयात पोलीस म्हणून कार्यरत आहेत.
गुरुवारी, १२ मार्च २०२६ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास, विलास शिंदे यांनी मुळेगाव येथील सासरच्या घरात कोणाच्याही लक्षात न येता गळफास घेतला. काही वेळानंतर ही घटना नातेवाईकांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने शिंदे यांना बेशुद्ध अवस्थेत जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
विलास शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी पूनम काळे, ५ वर्षांची मुलगी आणि अवघ्या ३ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. एका कर्तव्यदक्ष जवानाने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने त्यांच्या दोन्ही लहान मुलांचे पितृछत्र हरपले असून, संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या मृतदेहाचे शवविच्छेदन सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात करण्यात येत आहे. ही आत्महत्या कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

0 Comments