घरकुलाच्या शेवटच्या हप्त्यासाठी १२ हजारांची लाच; उंबरगावचे ग्रामपंचायत अधिकारी व शिपाई एसीबीच्या जाळ्यात

 




सोलापूर - पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाच्या शेवटच्या हप्त्यासाठी लाभार्थ्याकडून लाच मागितल्याप्रकरणी उंबरगाव (ता. पंढरपूर) येथील ग्रामपंचायत अधिकारी आणि शिपाई यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून अटक केली. या कारवाईत ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय अभिमान कांबळे यांना तक्रारदाराकडून १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणात ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत प्रकाश मुकरे (वय ४५) आणि शिपाई दत्तात्रय कांबळे (वय ४५) यांचा समावेश असून, दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलम ७, ७-अ व १२ अन्वये पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला पंतप्रधान आवास योजनेतून १ लाख २० हजार रुपयांचे घरकुल मंजूर झाले होते. मात्र शेवटचा हप्ता देण्यासाठी आरोपींनी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. पडताळणीदरम्यान ही मागणी सिद्ध झाल्यानंतर तडजोडीत १२ हजार रुपये देण्याचे ठरले.

१६ मार्च २०२६ रोजी एसीबीने सापळा रचला असता दत्तात्रय कांबळे यांना लाच स्वीकारताना पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर अधीक्षक अजित पाटील आणि उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय कामासाठी कोणी लाच मागितल्यास त्वरित तक्रार करावी.

Post a Comment

0 Comments