सोलापूर - सोलापूर शहरातील लोकमान्य नगर परिसरात बुधवारी रात्री घडलेली एक थरारक घटना परिसराला हादरवून गेली. रात्री साडेनऊच्या सुमारास एका पतीने स्वतःच्या पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.नरगिस फैजान शेख (वय ३६) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, आरोपी पती फैजान शेख हा घटनेनंतर फरार झाला आहे. जखमी अवस्थेत नरगिस घराबाहेर धावत आली तेव्हा तिच्या आक्रोशाने परिसरातील नागरिक धावून आले. तत्काळ तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
नरगिस आणि फैजान यांचा विवाह ७ सप्टेंबर २०२४ रोजी झाला होता. सुरुवातीचे काही महिने त्यांचा संसार सुरळीत चालला, मात्र नंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. दोघेही काही काळापासून वेगळे राहत होते. फैजानने नरगिसला तोंडी तलाक दिला होता, परंतु नरगिसला पुन्हा एकत्र राहायचे होते. याच कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते.बुधवारी रात्री फैजान सासरी आला. सुरुवातीला शांतपणे सुरू झालेली चर्चा काही वेळातच वादात बदलली. रागाच्या भरात फैजानने सोबत आणलेल्या पेट्रोलची बाटली काढली आणि नरगिसच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले. आग लागल्यावर नरगिस जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळाली, तर आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले.या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

0 Comments