Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर हादरले! पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या 'रील स्टार' महिलेची प्रियकराकडून हत्या; मृतदेह कालव्यात फेकला





पंढरपूर: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या एका ३४ वर्षीय महिलेची तिच्याच प्रियकराने गळा आवळून हत्या केली. सोनाली नेताजी जाधव (रा. भोसे, ता. पंढरपूर) असे मृत महिलेचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी तुकाराम गवधारे याला अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली जाधव ही गेल्या काही दिवसांपासून पतीपासून वेगळी राहून आपल्या माहेरी (भोसे) वास्तव्यास होती. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर रिल्स बनवून तिने परिसरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. याच काळात तिचे गावातीलच तुकाराम गवधारे याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले.मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. आरोपी तुकाराम याला सोनालीच्या चारित्र्यावर संशय होता. या संशयातूनच त्याने तिला संपवण्याचा कट रचला.

वाढदिवसाच्या दिवशीच गाठला काळ

६ एप्रिल रोजी सोनालीचा वाढदिवस होता. वाढदिवसाचे गिफ्ट देण्याच्या बहाण्याने तुकारामने तिला घराबाहेर बोलावले. तिला निर्जन ठिकाणी स्मशानभूमीजवळ नेऊन त्याने तिचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने तिचा मृतदेह जवळच असलेल्या कालव्यात फेकून दिला.

असा लागला छडा

सोनाली दोन दिवस घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी करकंब पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, पंढरपूरजवळील रोपळे गावच्या हद्दीत पोलिसांना एक मृतदेह आढळून आला. नातेवाईकांनी हा मृतदेह सोनालीचा असल्याची ओळख पटवली.तपासादरम्यान कुटुंबीयांनी तुकाराम गवधारे याच्यावर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी तातडीने हालचाली करत तुकारामला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. या हत्येमध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.


Post a Comment

0 Comments