Ticker

6/recent/ticker-posts

कारमध्ये कोंबल्या दोन गाई, माजी नगरसेवकाच्या मुलावर गुन्हा दाखल

 





सोलापूर -  पशुवाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून दोन गाईंना एका कारमध्ये अमानुषपणे कोंबून नेत असतानाचा धक्कादायक प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे. मंगळवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास गुरुनानक चौकातील तालुका पोलीस ठाण्यासमोर ही घटना घडली. याप्रकरणी माजी नगरसेवक इब्राहिम कुरेशी यांचा मुलगा बुलंद इब्राहिम कुरेशी याच्यासह दोन अनोळखी व्यक्तींवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरक्षक पवन नागेश बल्ला (वय २७, रा. जुना विडी घरकुल) यांना माहिती मिळाली होती की, एका कारमधून (क्रमांक: MH-13-AZ-9122) गो-तस्करी केली जात आहे. ही कार विजापूर रोडवरून आसरा चौक मार्गे शास्त्री नगरकडे जाणार होती.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुनानक चौकातील तालुका पोलीस ठाण्यासमोर ही कार थांबलेली असताना, कारमधून गाईंच्या हंबरण्याचा आवाज आला. पवन बल्ला यांनी कार चालकाकडे विचारणा केली असता, त्याने अरेरावी करण्यास सुरुवात केली. संशय आल्याने गाडीचा दरवाजा उघडला असता, आतमध्ये दोन गाई अत्यंत क्रूरपणे आणि दाटीवाटीने कोंबलेल्या असल्याचे निदर्शनास आले.

फिर्यादीने तातडीने '११२' क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होताच नागरिकांची गर्दी झाली. या गर्दीचा फायदा घेऊन आरोपी बुलंद कुरेशी याने कार भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी जिवाची पर्वा न करता पाठलाग करून जवाहर नगरमधील मनियार हॉस्पिटलच्या पाठीमागे कार अडवली आणि आरोपीला ताब्यात घेतले.

पवन बल्ला यांच्या फिर्यादीवरून शास्त्री नगर येथे राहणाऱ्या माजी नगरसेवक यांचे चिरंजीव बुलंद इब्राहिम कुरेशी आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल राजगुरू करत आहेत.


Post a Comment

0 Comments