सोलापूर: माहेरून पैसे आणि सोने आणण्यासाठी विवाहितेचा छळ करून तिला पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना सोलापूरच्या मजरेवाडी परिसरात घडली आहे. या अमानवीय कृत्यात गंभीर जखमी झालेल्या नर्गिस फैजान शेख (वय ३२) या महिलेचा अखेर उपचारादरम्यान मंगळवारी (२१ एप्रिल) मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती फैजान शेख (वय ३५) याला माहेरून हुंडा म्हणून पैसे आणि दागिने आणण्यासाठी पत्नीचा छळ करायचा. याच कारणावरून १५ एप्रिल २०२६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास बुधवारी रात्री फैजान सासरी आला. सुरुवातीला शांतपणे सुरू झालेली चर्चा काही वेळातच वादात बदलली. रागाच्या भरात फैजानने सोबत आणलेल्या पेट्रोलची बाटली काढली आणि नरगिसच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले. आणि दरवाजा उघडून तिथून पळ काढला.
या आगीत नर्गिस गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी सोलापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र मंगळवारी (२१ एप्रिल) त्यांची प्रकृती ढासळली आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.नर्गिस यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती.याप्रकरणी पीडित नर्गिस शेख हिने दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात पती फैजान, सासरे जावेद, सासू शमशाद आणि इतर नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुशांत वराळे करत आहे.

0 Comments