बार्शी - सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. बार्शी शहरात एका पतीने आपल्याच पत्नीची भररस्त्यात चाकूने तब्बल ५० वार करून निर्घृण हत्या केली आहे. बार्शी-परंडा रोडवर सोमवारी सकाळी हा थरार घडला. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.धनश्री पाटील असे मृत दुर्दैवी विवाहितेचे नाव असून, ऋषिकेश पाटील असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनश्री आणि ऋषिकेश हे दोघेही एका खासगी बँकेत एकत्र नोकरीला होते. तिथेच त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. अवघ्या महिनाभरापूर्वीच दोघांनी मोठ्या आशेने प्रेमविवाह (लव्ह मॅरेज) केला होता. संसार सुखाचा होईल असे वाटत असतानाच, लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्यात खटके उडू लागले. दोघांमध्ये सतत किरकोळ कारणांवरून वाद होत असल्याचे सांगण्यात येत आहे. याच वादाची परिणती अखेर एका भीषण हत्याकांडात झाली.
सोमवारी सकाळी धनश्री नेहमीप्रमाणे तिच्या स्कूटीवरून जात होती. बार्शी-परंडा रोडवर दबा धरून बसलेल्या ऋषिकेशने तिला रस्त्यातच अडवले. रस्त्यावरच दोघांमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण सुरू झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, ऋषिकेशने स्वतःसोबत आणलेला धारदार चाकू काढला आणि धनश्रीवर हल्ला केला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषिकेशने मागचा-पुढचा कोणताही विचार न करता धनश्रीवर सपासप सुमारे ५० वार केले.
हा हल्ला इतका भीषण होता की धनश्रीचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर धनश्री रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. दिवसाढवळ्या भररस्त्यात घडलेल्या या थरारामुळे परिसरात एकच पळापळ आणि खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. भररस्त्यात पत्नीची अशा प्रकारे हत्या केल्यामुळे बार्शी शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. महिनाभरापूर्वीच बांधलेली लग्नाची गाठ अशा रितीने रक्ताने माखली गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

0 Comments