Ticker

6/recent/ticker-posts

शहर के कमिशनर हम ही है’ म्हणत रील बनवणाऱ्या भाईची पोलिसांनी काढली भररस्त्यातून धिंड




सोलापूर - "चौकीयाँ चाहे पुलिस की हो, शहर के कमिशनर तो हम ही लोग है..."असा चित्रपटातील संवाद वापरत सोशल मीडियावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अल्पशिक्षित 'भाई'ची गुर्मी एमआयडीसी पोलिसांनी पार जिरवली आहे. नई जिंदगी परिसरातील मौलाना आझाद चौक येथे एका तरुणावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी भररस्त्यातून पायी चालवत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेले.

सैफ मुकदूम शेख राहणार नई जिंदगी,सोलापूर असे कडक कारवाई करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.गुरुवारी सायंकाळी ६:३० च्या सुमारास नई जिंदगी परिसरातील मौलाना आझाद चौक येथे जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ भांडण झाले. या भांडणाचे रूपांतर पुढे गंभीर हाणामारीत झाले. आरोपी सैफ शेख आणि त्याचा साथीदार जैद शामू शेख यांनी मिळून फिर्यादी मुस्तफा जाकीर शेख यांच्यावर कोयता आणि लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मुस्तफा गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले आहे.

आरोपी सैफ शेख याच्यावर मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी नसली, तरी गेल्या काही दिवसांपासून परिसरात लोकांना धमकावणे, विनाकारण वाद घालणे आणि स्वतःची दहशत निर्माण करण्याचे त्याचे प्रयत्न सुरू होते. परिसरातील हीच दहशत मोडीत काढण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आरोपीला तातडीने ताब्यात घेतले. त्याला गाडीत न बसवता, ज्या परिसरात त्याने दहशत माजवली होती, त्याच नई जिंदगी परिसरातून भररस्त्यातून पायी चालवत पोलीस ठाण्यापर्यंत नेण्यात आले.

आरोपी सैफने काही दिवसांपूर्वी एक हाताने गाडी चालवत नई जिंदगी परिसरात एक व्हिडिओ (रील) बनवला होता. त्यात "पोलिस चौकी के हिसाब से शहर बाट रहे हो सुल्तान, चौकीयाँ चाहे पुलिस की हो, शहर के कमिशनर तो हमी ही लोग है" हा डायलॉग बॅकग्राउंडला वाजत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, पोलिसांनी खाकीचा इंगा दाखवताच, 'कमिशनर' बनू पाहणाऱ्या सैफचा पोलिसांसमोर हात जोडून माफी मागतानाचा दुसरा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली असून, पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे भाईगिरी करणाऱ्या टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत.


पहा सविस्तर व्हिडीओ - 👇👇👇👇👇👇👇👇




Post a Comment

0 Comments