Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई-पुणे-सोलापूर ड्रग्ज कनेक्शन: पोलिसांच्या सापळ्यात अडकले दोन तरूण; एमडी ड्रग्जसह अटक





सोलापूर: सोलापूरच्या तरुणाईला नशेत ढकलण्यासाठी मुंबई आणि पुण्यातून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या टोळीचा सोलापूर जेलरोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ४६ ग्रॅम 'एमडी' ड्रग्ज घेऊन सोलापुरात आलेल्या दोघांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. सुफियान फुलारी आणि तौफिक सय्यद अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.सोलापूर शहरातील तरुणांच्या मागणीनुसार मुंबई आणि पुण्यातून एमडी ड्रग्जची तस्करी केली जात असल्याची खात्रीशीर माहिती सोलापूर शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जेलरोड पोलिसांनी एक विशेष योजना आखली. संशयितांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी स्वतःच एका ग्राहकाचे सोंग घेत त्यांना विजापूर वेशीत बोलावले.

बुधवारी (ता. २२) सायंकाळी पाचच्या सुमारास सुफियान आणि तौफिक चारचाकी गाडीतून पुण्यातून सोलापुरात पोहोचले. ठरल्याप्रमाणे ते विजापूर वेशीवर आले. मात्र, गाडीतून उतरण्यापूर्वीच त्यांनी आजूबाजूचा अंदाज घेतला. दरम्यान, त्यांना परिसरात पोलिसांच्या गाड्या दिसल्याने त्यांचा संशय बळावला. सावध झालेल्या आरोपींनी गाडी थेट रूपाभवानी मंदिर मार्गे तुळजापूरच्या दिशेने पळवली.

पोलिसांच्या दोन पथकांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. अखेर, तामलवाडी टोल नाक्याजवळ आरोपींची गाडी बंद पडली. गाडी बंद पडताच दोघांनीही पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र जेलरोड पोलिसांच्या पथकाने त्यांना शिताफीने पकडले.पोलिसांनी आरोपींकडून ४६ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी जप्त केली आहे. गुरुवारी (ता. २३) या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना २६ एप्रिलपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील करत आहेत. शहरात ड्रग्जचा पुरवठा करणारे मूळ सूत्रधार कोण आहेत आणि त्यांचे नेटवर्क किती मोठे आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

Post a Comment

0 Comments