सोलापूर - सोलापूर शहरातील जुळे सोलापूर भागातील ए.जी. पाटील नगर येथे काम करत असताना विजेचा तीव्र शॉक लागून महानगरपालिकेच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज, बुधवार दि. २० मे २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.इस्माईल सलीम पटेल (वय ३२, रा. गजानन नगर, होटगी रोड, सोलापूर) असे मृत पावलेल्या तरुण कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इस्माईल पटेल हे सोलापूर महानगरपालिकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. आज सायंकाळी ते ए.जी. पाटील नगर परिसरात आपले शासकीय कर्तव्य बजावत असताना, अचानक त्यांना विजेचा तीव्र झटका (शॉक) लागला. शॉक इतका भीषण होता की, ते जागेवरच बेशुद्ध पडले.या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि सहकाऱ्यांनी तातडीने धाव घेत त्यांना सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारपूर्वीच मृत' घोषित केले.
इस्माईल यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाची बातमी समजताच सिव्हिल हॉस्पिटल परिसरात त्यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी एकच गर्दी केली होती. अचानक घडलेल्या या वज्राघातामुळे मृतकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.मृत इस्माईल पटेल यांच्या पश्चात आई, वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता तरुण मुलगा गमावल्यामुळे गजानन नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

0 Comments