Ticker

6/recent/ticker-posts

रिल स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरण: २३ दिवसांनंतर पती निलेश पाराध्येवर गुन्हा दाखल

 


मंगळवेढा: सोशल मीडियावर आपल्या रिल्सच्या माध्यमातून लाखो चाहत्यांची मने जिंकणारी ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील प्रसिद्ध रिल स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्या प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. या घटनेच्या तब्बल २३ दिवसांनंतर मंगळवेढा पोलिसांनी रोहिणीचा पती निलेश विलास पाराध्ये याच्याविरुद्ध शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

 

काय आहे नेमके प्रकरण?- 

२६ मे रोजी ब्रह्मपुरी हद्दीतील ग्रामपंचायत हॉटेलमध्ये रोहिणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. तिच्या अचानक जाण्याने सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.सुरुवातीला या मृत्यूबाबत परिसरात आणि सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणि कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनंतर यामागील धक्कादायक सत्य समोर आले.रोहिणीचे वडील बाळू गिरजाप्पा शिवशरण यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अधिकृत फिर्याद दिली आहे.

रोहिणीची अजिबात इच्छा नसतानाही पती निलेश गेल्या वर्षभरापासून तिला हॉटेलमध्ये जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडत होता.घरगुती कारणांवरून तिच्याशी सतत वाद घालणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण करून अमानुष मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता.रोहिणीच्या मृत्यूनंतर न्याय मिळण्यासाठी सोशल मीडियावर आणि नागरिकांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी होत होती. अखेर वडिलांच्या तक्रारीवरून मंगळवेढा पोलिसांनी आरोपी पती निलेश पाराध्ये याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 


Post a Comment

0 Comments