सोलापूर ब्रेकिंग | स्वागत नगरमध्ये २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, कमानीवर झेंडा लावताना बसला विजेचा धक्का


 


सोलापूर - सोलापूर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. आपल्या संसाराचा गाडा चालवण्यासाठी आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी धडपडणाऱ्या एका 24 वर्षीय तरुण मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केतन रमेश पाटोळे असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, स्वागत नगर परिसरात घडलेल्या या घटनेने सोलापूर शहर हादरून गेले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, केतन हा व्यवसायाने मंडप सजावटीचे काम करत होता. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास स्वागत नगर येथील यशवंत सोसायटीच्या परिसरात तो काम करत होता. मंडपाच्या कमानीवर चढून झेंडा लावताना अचानक केतनच्या हातातील स्टील पाईपचा संपर्क महावितरणच्या विद्युत तारेशी झाला. वीज प्रवाहाच्या तीव्र झटक्याने केतन थेट कमानीवरून खाली कोसळला.


अपघात घडल्यानंतर उपस्थितांनी केतनला तात्काळ सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच केतनची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.


केतनच्या अचानक जाण्याने पाटोळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.घटनेची माहिती मिळताच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईक आणि मित्रांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, एक तरुण आणि उत्साही जीव अशा प्रकारे काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments