Ticker

6/recent/ticker-posts

ब्रेकींग । सोलापुरात बालविवाहास पोलिसांचा 'ब्रेक'; १३ वर्षीय मुलीचा रोखला विवाह




सोलापूर -  सोलापूर शहरातील बाळे परिसरातील एका मंगल कार्यालयात होणारा बालविवाह सोलापूर शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोखण्यात आला. या कारवाईत एका १३ वर्षीय मुलीचे आयुष्य वाचवण्यात यश आले असून, दोन्हीकडील कुटुंबियांचे समुपदेशन करून हा विवाह थांबवण्यात आला आहे.

सोलापूर शहरातील अंबिका नगर, बाळे येथील 'गुरुकमल मंगल कार्यालय' (खंडोबा मंदिर जवळ) येथे आज, २५ एप्रिल २ ० २ ६  रोजी बालविवाह होणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, तिथे वधू आणि वर पक्षाकडील नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साखरपुडा उरकून विवाहाची तयारी सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ वधूच्या पालकांकडे तिची विचारपूस केली व कागदपत्रांची पडताळणी केली. यामध्ये वधूचे वय केवळ १३ वर्षे, ६ महिने आणि १२ दिवस असल्याचे निष्पन्न झाले.

अल्पवयीन मुलीचे लग्न लावणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे सांगून पोलिसांनी उपस्थित नातेवाईकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची गंभीर जाणीव करून दिली. पोलिसांनी दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन करून लग्नाचे आयोजन रद्द करण्यास भाग पाडले. त्यानंतर, संबंधित अल्पवयीन मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले.ही कारवाई सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक स्नेहा म्हेतर, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुतार आणि महिला सुरक्षा कक्षाच्या पथकाने संयुक्तरीत्या सहभाग घेत ही कारवाई यशस्वी केली.

Post a Comment

0 Comments