मंगळवेढा : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना मोफत मिळणे अपेक्षित असताना, मंगळवेढ्यात एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टर आणि त्यांच्या 'आरोग्य मित्रा'ने चक्क शस्त्रक्रियेसाठी लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई करत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदाराच्या ७२ वर्षीय आईचा पाय घसरल्याने त्यांना उपचारासाठी मंगळवेढ्यातील एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगितले. तक्रारदाराची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी 'महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने'अंतर्गत मोफत उपचाराची मागणी केली.मात्र, या योजनेचा लाभ देण्याऐवजी, संबंधित खाजगी डॉक्टर आणि 'आरोग्य मित्राने' शस्त्रक्रियेसाठी १६ हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी ६ हजार रुपये सुरुवातीला लाच म्हणून स्वीकारून शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर, रुग्णाला डिस्चार्ज देण्यासाठी उरलेल्या १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
या प्रकाराबाबत तक्रारदाराने सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. २४ मार्च २०२६ रोजी एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपींनी १० हजारांची लाच मागून तडजोडीअंती ५ हजार रुपये घेण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. यावरून डॉक्टर अरुणकुमार महिंद्रकर (वय ४५) आणि आरोग्य मित्र सोमनाथ इंगळे (वय ३८) यांच्यावर मंगळवेढा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली गरिबांची लूट होत असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले करत आहेत.ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, शासकीय कामासाठी कोणीही कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागत असल्यास नागरिकांनी तात्काळ अँटी करप्शन ब्युरो, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे.

0 Comments