सोलापूर: सणासुदीच्या वातावरणात आनंदाने न्हाऊन निघालेल्या सोलापूर शहराला एका अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेने हादरवून सोडले आहे. केवळ मोठ्याने गाणी वाजवण्यास मनाई केल्याच्या क्षुल्लक वादातून एका १९ वर्षीय नऊ महिन्यांच्या गरोदर विवाहितेची भिंतीवर डोके आपटून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत विवाहितेसह तिच्या गर्भातील बाळाचाही दुर्दैवी अंत झाला आहे.
सोलापूरच्या अलकुंटे चौक परिसरातील रहिवासी असलेली सोनी गणेश रामपूरे (वय १९) ही विवाहिता माहेरी आली होती. सोनीचे लग्न अवघ्या एका वर्षापूर्वी झाले होते आणि ती नऊ महिन्यांची गरोदर होती. दरम्यान, घरासमोर राहणारा आरोपी बापू सुरेश आरगोळ (वय २६) हा घराबाहेर मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावून लहान मुलांसोबत नाचत होता आणि गोंधळ घालत होता.सोनीची आई, लक्ष्मी राम म्हेत्रे यांनी आरोपीला विनंती केली की, "माझी मुलगी नऊ महिन्यांची गरोदर आहे, कृपया साऊंड बंद करा आणि गोंधळ थांबवा." ही साधी विनंती आरोपीच्या चांगलीच जिव्हारी लागली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापू आरगोळ याच्या मनात सोनीचे लग्न त्याच्याशी झाले नसल्याचा जुना राग होता. याच रागातून त्याने लक्ष्मी म्हेत्रे यांना शिवीगाळ करत ढकलून दिले. त्यानंतर, नऊ महिन्यांची गरोदर सोनी समोर असतानाही त्याने अमानुषपणाची परिसीमा गाठली. त्याने सोनीचे तोंड एका हाताने दाबले आणि दुसऱ्या हाताने तिचा गळा आवळून तिचे डोके जोरात भिंतीवर आदळले. या क्रूर हल्ल्यात सोनी आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला.
फिर्यादी लक्ष्मी म्हेत्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर बझार पोलीस ठाण्यात आरोपी बापू सुरेश आरगोळ याच्या विरोधात BNS १०३(१) आणि ३५२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.एका वर्षापूर्वी ज्या हातांवर लग्नाची मेहंदी रंगली होती, त्याच हातातील बांगड्यांचा आवाज या घटनेमुळे कायमचा शांत झाला आहे. या घटनेने संपूर्ण सोलापूर हळहळ व्यक्त करत आहे.

0 Comments